हा लेख जेव्हा मी लिहायला बसलो तेव्हा विचार केला होता कि ईंग्रजीमधे लिहीन. पण जसे मी ह्या लेखाबद्दल विचार करायला लागलो तसतसे ठरवले कि इंग्रजी सोडून मराठी भाषेत हा लेख लिहीन. अशी प्रयत्नांची पराकाष्ठा मी पहिल्यांदा करतोय, त्या मुळे जर काही चूकभूल झाली तर माफी असावी असे अस्वीकरण घेऊन तुम्हा लोकांशी माझी हि नम्र विनंती आहे कि चुकांना कसे सुधारू हे लेखाच्या टिपण्यांतून कळवावे.
अजिंक्य परिवारात सद्ध्या दोन मस्तीखोर कार्टी आहेत. मोठीचे नाव आहे अनसूया आणि छोट्याचे नाव आहे मल्हार. दोघेही शाळेत जातात. मी विचार केला की त्यांना माझ्याच शाळेत म्हणजे पार्ले टिळक विद्यालय मध्ये भरती कारेन. देवाचा आशिर्वादानी आणि बरोबर “जॅक ” लावून त्यांची ऍडमिशन झाली. मी इंग्रजी माध्यमात शिकलो आहे, म्हणून विचार केला कि मुलांनाही इंग्रजी माध्यमात टाकावे. ते पण आय से एस सी बोर्ड मध्ये. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा मुलांच्या शिक्षणाचा विचार घेऊनच तो केला होता.
भाषा हि एक संपर्काचे माध्यम आहे. जर तुमच्याशी कोणीही त्या भाषेत संपर्क साधणार नाही, तर तुम्ही ती भाषा वापरणार नाही. हळू हळू, तुम्ही ती भाषा विसरायला लागणार.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत जी भाषा आपण वापरतो तीच आपली मातृभाषा, असे म्हणायला काहीच हरकत नाही. मग तर माझ्या मुलांची भाषा इंग्रजी आहे. त्यांना गप्प करायचे असेल तर मी त्यांना म्हणतो “मुलांनो आता मराठीचा तास!”
घरी आम्ही मराठी फार क्वचित वापरतो. अर्थात संध्याकाळी मराठी टीव्ही चालू असतो, पण तो तर आजी आणि आजोबांसाठी असतो. एक तर घरी भाषेचा वापर कमी, शाळेत पण फक्त मराठीचा तासात भाषेचा वापर होतो. बाकी सगळा वेळ मोबाईल आणि टीव्ही मध्ये जातो. ह्या दोन माध्यमामध्ये इंग्रजीचा वापर जास्त होतो.
मुद्दा हा, कि दिवसात मराठीचा वापर होताच नाही.
कारणीभूत कोण?
खरंतर हि माझीचं चूक आहे.
भाषेचा वापर कसा करावा हे जर दिसले नाही तर मग ती भाषा कशी वापरायची ते कसे कळणार? मान्य आहे कि मी काही मराठीचा पापड नाही. पण, प्रयत्न नाही केला तर आता जसा माकड आहे तसाच माकड राहीन. आणि जेव्हा माझी पोरं मराठी भाषेची चिरफाड करतील तेव्हा मी फक्त “हूप हूप ” करिन!
एक रामबाण उपाय
मराठीत जास्तीत जास्त संचार करून भाषेचा वापर वाढवा.